समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथील सोहम जुनेघर या विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका साधना शिंदे यांनी दिली. नवोदय विद्यालय प्रवेशासाठी बुद्धिमत्ता, गणित, भाषा या तीन विषयांची 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा घेऊन विद्यार्थी निवड केली जाते. पिंपळे जगताप येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी या परीक्षेतून ६० टक्के मुली व ४० टक्के मुले निवडले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत जवाहर नवोदय विद्यालयात केंद्र शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिले जाते. सोहमला वर्गशिक्षिका मधुमालिनी विजय गोडसे यांनी मार्गदर्शन केले. “सोहम हा हुशार विद्यार्थी असल्याने त्याला नवोदय विद्यालयातील सीबीएसई अभ्यासक्रमाचा निश्चितपणे भविष्यात फायदा होईल” असे त्याच्या वर्गशिक्षिका मधुमालिनी गोडसे यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापिका साधना शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख प्रकाश लंघे सर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे मॅडम, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर साहेब, सरपंच रमेश गडदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी जाधव , व्यवस्थापन समिती सदस्य तसेच माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, पत्रकार राजाराम गायकवाड, सतिश तायडे, चंद्रकांत मांढरे, वंदना वर्मा, शितल जाधव, अपर्णा ढोले तसेच सर्व ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
