समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे, (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील फाकटे येथील घरकुलासाठी ११ भिल्ल आदिवासी नागरिकांना आज दि.९ ला जागतिक आदिवासी दिना निमित्ताने हक्काची जागा ते हि ७/१२ उताऱ्यासह देण्यात आली. या ठिकाणी ११ आदिवासी नागरिकांना आगामी काळात हक्काची घरकुले मिळवून देण्याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम गटविकास अधिकारी महेश डोके यांनी उपस्थित आदिवासी भिल्ल समाज नागरिक,ग्रामस्थांना दिले. कार्यक्रमास सरपंच रेश्मा पिंगळे,शिरूर पंचायत समीतीच्या माजी सदस्या डॉ.कल्पना पोकळे,सामाजिक चांडोह येथील कार्यकर्ते शांताराम पानमंद, पत्रकार बंधू,आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे उपस्थित होते.
फाकटे गावातील वर्षानुवर्षे दुर्लक्षित व प्रलंबीत प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या गावच्या सरपंच रेश्मा नितीन पिंगळे यांनी विविध विकासकामे गतिमानपने सोडण्याचे कार्य सुरू ठेवले असून गावातील आदिवासी भिल्ल समाजाला राहण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाकडे जागा मिळावी म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.याकामी पत्रकार अरुणकुमार मोटे यांचा पाठपुरावा देखील महत्वपूर्ण ठरला.तर शासनाने आज आदिवासी दिनी येथील ११ आदिवासी बांधवाना ज्याप्राकारे जागा उपलब्ध करून दिली.त्याच प्रकारे शासनाच्या गरीबांच्या कल्याणाच्या योजनेतून त्यांना तात्काळ घरकुल मिळावीत व येथील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला जातीचा दाखला,रेशनकार्ड देण्याची प्रशासनाने तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष शेटे यांनी यावेळी बोलताना केली. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना या ११ आदिवासी बांधवांना लवकरात लवकर हक्काची घरकुल नक्कीच मिळावीत या कामी प्राधान्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम गटविकास अधिकारी महेश डोके यांनी उपस्थित ग्रामस्थ आदिवासी बंधूना आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंगळे यांनी केले.