प्रतिनिधी शिरूर : शिरूर तालुक्यातील बाबुरावनगर जवळील ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदनाने झाली. राष्ट्रध्वजाला सलामी देत विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीची भावना व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर राजे निंबाळकर, महाराष्ट्र राज्य भाजप विधी सेल प्रमुख ॲड.धर्मेंद्र खांडरे, राहुलदादा पाचर्णे, PSI महादेव वाघमोडे, मा.सरपंच विठ्ठल पवार, डॉ. भालेराव, डॉ.ठोंबरे, डॉ. पाचुंदकर, डॉ.घावटे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने विशेष पाहुणे म्हणून ह.भ.प.श्री. हिरामण महाराज कर्डिले, ह.भ.प.श्री. नवनाथ महाराज माशेरे, ह.भ.प.श्री. खंडेराय महाराज टोणगे, ह.भ.प.श्री. संभाजी महाराज दरोडे, ह.भ.प.श्री. दादा महाराज ढवळे, ह.भ.प.श्री. किशोर महाराज नवले, ह.भ.प.श्री. दादा महाराज तांबे यांना सन्मानीत करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, देशातील स्वातंत्र्यवीरांवरील भाषणे व नाटिकांचे सादरीकरण केले. शालेय प्रांगण देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेले. उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली. यावेळी ज्ञानगंगा विश्वविद्यालय येथील इ. ९वी मध्ये शिकणारा विद्यार्थी बालाजी व्यंकटी उबाळे यास संस्थेच्या वतीने त्यास क्रीडा क्षेत्रात (ऍथलेटिक्स) उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे, २ लाख १ हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्याची खेळाप्रती जिद्द, चिकाटी व त्यामागील तो सातत्याने घेत असलेले परिश्रम पाहून संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेराम घावटे यांनी त्याच्या पुढील १२ वी पर्यांतचा शैक्षणिक खर्च तसेच क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शन व त्यासाठी लागणारी सर्वोतोपरी सहकार्य संस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या आपल्या भाषणात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली व विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम’च्या घोषात झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.