समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या मंगळवार दि. ०४ रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान वन विभागाच्या शार्प शूटर्सकडून करण्यात आलेल्या थरारक कारवाईत ठार झाला. मागील वीस दिवसांमध्ये दि. १२ ऑक्टोंबर २५ रोजी शिवन्या शैलेश बोंबे ही साडे पाच वर्षांची चिमुरडी,दि. २२ ऑक्टोंबर रोजी भागुबाई रंगनाथ जाधव,या ८२ वर्षे वयाच्या आजी आणि १३ वर्षांचा रोहन विलास बोंबे यांचे वन्य प्राणी बिबट च्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर जुन्नर,शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक १२ व २२ ऑक्टोंबर २५ रोजी पंचतळे येथे बेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखण्यात आला होता तर ३ नोव्हेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पुणे नाशिक महामार्ग रोखून वरील चारही तालुक्यातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करीत नाकर्त्या शासनाचा तीव्र शब्दात संताप व्यक्त करीत शासनाकडून खासकरून वन विभागाकडून तात्काळ,ठोस उपाय योजना करण्याची गरज अनेक आंदोलकांनी तीव्र शब्दात व्यक्त केली होती. २ नोव्हेंबर ला बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला. याच दिवशी संतप्त जमावाने वनविभागाचे गस्ती वाहन तसेच वनविभागाचे पिंपरखेड येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ करीत निषेध व्यक्त केला.
३ नोहेंबर ला संतप्त ग्रामस्थ व नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग सुमारे १८ तास रास्तारोको आंदोलन करीत रोखून धरला होता.नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील वन्यप्राणी बिबट्यास जेरबंद करा किंवा ठार करा अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती. संतप्त झालेल्या आंदोलकांची व पिंपरखेड परिसरातील ग्रामस्थांची सदर बिबट्याला ठार करण्याची मागणी लक्षात घेत वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची तात्काळ परवानगी घेतली. सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणे चे डॉ. सात्विक पाठक पशु चिकित्सक जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटर सह वन विभागाची टीम घटनास्थळ व परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दिवसभरात या परिसरात ठीकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोन च्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटना स्थळापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर सदर बिबट्या त्यांना दिसून आला. सदर टीमने तात्काळ त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला परंतु तो अपयशी ठरल्याने चवताळलेल्या बिबट्याने टीम वरच प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तरबेज बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबट्या यात ठार झाला. ठार झालेल्या बिबट्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव शिरूरच्या पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले. त्यानंतर ठार झालेल्या बिबट्याचे शव शवविच्छेदना करिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले.ही कार्यवाही वनसंरक्षक वनवृत्त पुणे आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत खाडे उपवनसंरक्षक जुन्नर,श्रीमती स्मिता राजहंस,अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी पार पडली.



