समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे: (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याने दिवसाच केलेल्या हल्ल्यात एका तेरा वर्षीय निष्पाप बालकाचा तर एका निष्पाप चिमुकलीचा व जांबुत येथे एका वृद्ध महिलेचा घेतलेला बळी या घटनांच्या निषेधार्थ शासन व वन विभागाचा तीव्र निषेध करत शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई येथे अष्टविनायक महामार्गावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील पिंपरखेड,जांबुत या ठिकाणी नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या पंधरा दिवसात तीन जणांचे नाहक बळी गेले आहेत. यात पिंपरखेड येथील दोन लहान मुले व जांबुत येथील एक वृद्ध महिलेचा नाहक बळी गेला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिरूरच्या पश्चिम भागातील ग्रामस्थ बिबट्यांचे सातत्याने होत असलेले हल्ले याबाबत वन विभागाने ठोस उपाय योजना कराव्या यासाठी मागण्या व आंदोलन करीत आहेत. दि.२ रोजी रोहन विलास बोंबे या १३ वर्षाचे निष्पाप बालकाचा बिबट्याने बळी घेतल्या नंतर नागरीकांचा संताप अनावर झाला.वन विभागाची गाडी व स्थानिक कार्यालय संतप्त ग्रामस्थांनी पेटवून दिले. या घडलेल्या घटनेच्या व वनविभागाच्या हलगर्जी निषेधार्त दि.३ रोजी कवठे येमाई बाजार स्थळ येथे ग्रामस्थांनी सकाळी ९ ते १० यावेळेत अष्टविनायक महामार्ग रोखुन धरत टायर जाळत नाकर्त्या शासनाचा निषेध केला.


कवठे येमाई येथे झालेल्या रास्तारोको आंदोलनामधे शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे,सुदामभाऊ इचके माजी सरपंच बबनराव पोकळे,माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब डांगे,राजेश सांडभोर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,भरत भोर मारुती वागदरे,ग्रामपंचायत सदस्य राजेन्द्र ईचके,पांडुरंग भोर, निलेश पोकळे, उत्तम जाधव, सचिन बोहाडे, किसन हिळाल, विठ्ठल मुंजाळ, रामदास सांडभोर, निखील घोडे, मिठ्ठुलाल बाफणा,डॉ. उचाळे,अभिजीत सांडभोर, सुनिल वागदरे, गणेश रत्नपारखी, कैलास बच्चे व अनेक ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या दोन चिमुकल्यांना शालेली विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली.कवठे येमाई परिसरात ही मोठ्या संख्येने बिबटे असण्याची शक्यता व्यक्त होत असून अनेक विद्यार्थी,विद्यार्थिनी सहा,सात किमी वरून शिक्षणासाठी गावात येत असतात.सतर्कता म्हणून वन विभागाने काही अघटित घटना घडण्याआगोदर ठोस उपाय योजना तात्काळ राबविण्याची गरज ग्रामस्थानी व्यक्त केली आहे. दरम्यान रास्तारोको आंदोलनामुळे कवठे येमाई येथे अष्टविनायक महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.मात्र वेळीच प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करत आंदोलन कर्त्यांना महामार्ग मोकळा करण्यास भाग पाडले.प्रशासनाचे वतीने मंडल अधिकारी विजय फलके व ग्राम विकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले.



