समाजशील न्यूज नेटवर्क,शिक्रापूर ( प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – पुणे – अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापूर पासून शिरूरच्या दिशेने २ किलोमीटर अंतरावर लांडे वस्ती पुलाजवळ कच-याचा ढीग बऱ्याच दिवसांपासून साचलेला आहे. महामार्गाच्या साईड पट्टीवर आलेला कच-याचा ढीग उचलण्याची कार्यवाही केली जात नाही. शिक्रापूर पासून शिरूरच्या दिशेने १५ किलोमीटर अंतरावर एम आय डी सी ,औद्योगिक वसाहत असल्यामुळे शिरूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे तसेच ओव्हरटेक करणा-या वाहनांमुळे दुचाकीस्वारांना दुचाकी साईड पट्टीवरून चालवावी लागते. साईड पट्टी वर कच-याचा ढीग आला असल्यामुळे दुचाकीस्वारांना दुचाकी चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कच-याच्या ढीगातील कचरा कुजून दुर्गंधीही सुटली आहे.पुण्यापासून २४ व्या मैलावर शिक्रापूरपासून शिरूरच्या दिशेने २ किलोमीटर अंतरावर असलेल्या लांडेवस्ती पुलाजवळील कच-याचा ढीग तात्काळ हटविण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांनी व्यक्त केली आहे.