समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई गावठाणात असलेल्या परंतु देवीच्या नावाने गावात अर्पण केलेल्या गायी व बैलांचा तात्काळ बंदोबस्त करा व त्यांना योग्य त्या ठिकाणी स्थलांतरीत करा असे नम्र आवाहान गावा च्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांनी केले आहे. यात गायी,बैल व वळू धरून सुमारे १८ जनावरे असल्याची माहिती शेतकरी अभिनव पोकळे,पवन जाधव,अभिजित सांडभोर,योगेश उचाळे,रामदास पोकळे यांनी दिली.

गावठाणाच्या कडेला असणाऱ्या शेतीचे हा गाय,बैलांचा जथा गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड नासधूस करीत असून परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान होऊन त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आज ही समस्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांदळकर व त्रस्त शेतकरी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांना ही समस्या सांगितल्या नंतर त्यांनी आगामी मासिक मिटींग व ग्रामसभेत प्राधान्याने हा विषय मांडणार असून जनावरांचा हा जथा सुरक्षित ठिकाणी किंवा पांजरपोळ येथे हलविण्याकामी परिसरातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारी व गावठाण परिसरात मुक्त वावरत असलेल्या या जनावरांचा योग्य तो बंदोबस्त करण्याकामी ग्रामसभेतून व ग्रामपंचायत प्रशासनाकडून नक्कीच योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.त्यातच या जथ्यातील वळू बैल अत्यंत धोकेदायक वाटत असून त्याला गावात पाहताच अनेकांची धडकी भरत आहे.या मुक्त जनावरांकडून गावातील माणसांना काही इजा व्हायच्या आत आता यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी ही ग्रामस्थ व त्रस्त शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असून जनावरांचा हा जथा शक्यतो रात्रीच्या वेळी नजीकच्या पिकांमध्ये जात असून तेथील पिकावर यथेच्च ताव मारून नासधूस करत पहाटे परत गावात जात असल्याचे पवन जाधव,अभिनव पोकळे,अभिजित सांडभोर,रामदास पोकळे,पोपट उचाळे यांनी सांगितले.



