समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई हे एक महत्वपूर्ण गाव असून येथील गजबज व वर्दळ असलेल्या श्री येमाई देवी चौका जवळ रस्त्यालगत रामदेव स्टील दुकानासमोर रस्त्याच्या कडेला असलेले ड्रेनेज गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत असून ते परिसरासाठी अक्षरशः धोकादायक ठरत आहे. या उघड्या ड्रेनेजमध्ये अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहने अडकण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र संबंधित विभागास याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत असून संबंधित विभाग अपघाताची वाट पाहतोय काय ? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
याच परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.शाळकरी मुले,ज्येष्ठ नागरिक,महिला तसेच दुचाकीस्वार यांना या उघड्या ड्रेनेजमुळे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात तर हा धोका आणखीच वाढण्याची शक्यता असून अंधारात ड्रेनेज दिसून न आल्याने वाहनचालक थेट त्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामस्थांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप त्या ठिकाणी मजबूत झाकण बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का ?” असा सवाल देखील उपस्थित होत आहे.



