समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – दीपावलीचे सुट्टी संपली व काल दि.१३ ला सकाळी शिक्षक शाळेत आले असताना अनेक वर्गांची कुलपे तोडलेली व कपाटे उचलून शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त पडलेले शिक्षकांच्या निदर्शनास आले.दीपावली सुट्टीत झालेल्या मुंजाळवाडी प्राथमिक शाळेतील या चोरीत सुमारे पंधरा हजार रुपयांचे शैक्षणिक व इतर साहित्य चोरीस गेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत चोरटयांनी ऍसिड चा देखील वापर केल्याचे निदर्शनास आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता गायकवाड,दिपक मुंजाळ,संतोष शिंदे,मारुती हिलाळ,बाळासाहेब इचके,मनिषा घोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या मुंजाळवाडी जिल्हा परिषद शाळेत चोरी झाल्याचा प्रकार काल दिवाळीच्या सुट्टी नंतर प्रथमच शाळा सुरू होताच सकाळी दहाच्या दरम्यान शिक्षकांच्या निदर्शनास आला. दिवाळी सुट्टीच्या काळात चोरी झाल्याची माहिती उपस्थित शिक्षकांनी तात्काळ स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व मुंजाळवाडी ग्रामस्थांना दिली. सामाजिक कार्यकर्ते किसन हिलाळ, संतोष मुंजाळ,युवा नेते भाऊसाहेब घोडे, व ग्रामस्थांनी तात्काळ शाळेत जाऊन चोरी झालेल्या घटनेची पाहणी केली. याबाबतची माहिती तात्काळ शिरूर पोलिसांना देण्यात आली. शिरूर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून शाळेतील या चोरीच्या घटनेत सुमारे पंधरा हजार रुपयांचे शैक्षणिक व इतर साहित्य चोरीस गेल्याचे उपस्थित शिक्षकांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले. तर शाळेत झालेल्या या चोरीचा पोलिसांनी तात्काळ छडा लावत यातील आरोपींना अटक करण्याची मागणी किसन हिलाळ,संतोष धारू मुंजाळ व ग्रामस्थांनी केली आहे.