समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातील पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यातील बहुसंख्य ठिकाणी POS मशीनची सेवा मागील आठ दिवसांपासून वारंवार बंद पडण्याचे प्रकार घडत असल्यामुळे दुकानदार,शिधापत्रिका धारक वैतागले असून त्यांना नाहक मनस्तापास सामोरे जावे लागत असल्याची माहिती पुणे जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ वचकल,शिरूर तालुका अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यासाठी POS मशीनचा वापर करण्यात येतो. तथापि, मागील काही काळापासून या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे गरीब व गरजू लाभार्थ्यांना वेळेत आणि योग्य प्रकारे धान्य मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.त्याकरिता शासन स्तरावरून तात्काळ कार्यवाही होऊन ही लोकोपयोगी सेवा विनाव्यत्यय सुरु असणे नितान्त गरजेचे आहे.शासनाकडून ऑगस्टचा देखील धान्य पुरवठा स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध झाला आहे. असे असताना धान्य वितरण प्रणालीत सर्व्हरच्या येणाऱ्या व्यत्ययामुळे सध्या अडचणी येत आहेत.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना या समस्येबाबत अवगत केले असल्याचे तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी सदाशिव होनमने यांनी सांगितले.
POS मशीनमध्ये बायोमेट्रिक अंगठा स्कॅन करताना वारंवार अपयश येणे,नेटवर्क कनेक्टिव्हिटी सतत खंडित होणे,मशीन सतत हँग होणे किंवा अपडेट न होणे,काही लाभार्थ्यांचे नाव असूनही मशीनमध्ये माहिती न दर्शविणे या तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना अनेक वेळा रांगेत तासन्तास उभे रहावे लागते, या बाबी प्रशासनातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी POS मशीनच्या कार्यक्षमतेची तातडीने तपासणी करून सुधारणा करण्याची गरज व्यक्त होत असून आवश्यक असल्यास वितरण व्यवस्थेत तांत्रिक सहाय्यक नियुक्ती करण्यात यावी,लाभार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे..शासनाकडून ऑगस्ट महिन्याचे धान्य देखील सर्वत्र उपलब्ध झाल्याची माहिती मिळत असून ३१ जुलैपर्यंत वाटप करणे बंधनकारक असताना अनेक शिधापत्रिका धारकांची बाकी असलेली ई केवासी ३१ जुलै अखेर मुदतीपर्यंत होणे अशक्य असल्याने ई केवायसी साठी सरकारने आणखी मुदत देण्याची गरज शिरूर तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांनी व्यक्त केली आहे.
आशिष अत्राम – कक्ष अधिकारी पुरवठा मंत्रालय,मुंबई
NIC चा सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी स्वस्त धान्य वितरणात राज्यात बहुसंख्य जिल्ह्यात अडचणी येत आहेत. केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेकडे याबाबत सातत्याने संपर्क सुरु असून सर्व्हर दुरुस्तीचे काम प्रगति पथावर चालू आहे. आगामी दोन दिवसांत ही सेवा पूर्वावत सुरु होईल व रेशन दुकानदार व ग्राहकांना येणाऱ्या अडचणी लवकरात दूर होतील.