प्रशासन सुस्त की नागरिकांचा बेफिकीरपणा? वर्षाताई नाईक यांचा संतप्त सवाल धनकवडीतील स्वच्छतेचा बोजवारा; केके मार्केट परिसरासह पुण्याई नगर लेन क्रमांक ४ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य

57
समाजशील न्यूज नेटवर्क,धनकवडी,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – धनकवडी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, केके मार्केटला लागून असलेल्या गॅरेज समोरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या कठड्यावर तसेच त्याच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. नागरिकांनी विविध प्रकारचा कचरा अक्षरशः रस्त्यावर च टाकल्याने परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. विशेष म्हणजे हा रस्ताही नियमितपणे झाडला जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याचबरोबर पुण्याई नगर लेन क्रमांक ४ मध्ये क्राऊन बेकरीपासून एकता महिला मंडळापर्यंतच्या रस्त्याचीही नियमित साफसफाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक दिवस रस्ते न झाडल्याने धूळ, कचरा आणि घाणीचे थर साचत आहेत. सातत्याने कचरा साचूनही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

“स्वच्छतेची जबाबदारी असलेले कर्मचारी नेमके करतात काय? अधिकारी हा प्रकार दिसत असूनही दुर्लक्ष का करीत आहेत? प्रशासन सुस्त आहे की नागरिकांचा बेफिकीरपणा वाढला आहे?” असा संतप्त सवाल युवा क्रांती फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला सह संपर्कप्रमुख श्रीमती वर्षाताई नाईक यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करून नियमित साफसफाई, कचरा उचलणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे.
त्याचबरोबर नागरिकांनीही आपला कचरा रस्त्यावर, कठड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता महापालिकेने निश्चित केलेल्या कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आता या गंभीर प्रकाराची संबंधित महापालिका यंत्रणा दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून तातडीने स्वच्छता करणार का? की नागरिकांनी तक्रारी करूनही अधिकारी आणि कर्मचारी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार? याकडे धनकवडीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *