नाशिक फाटा-राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला १५ दिवसांत गती

5

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, पुढील १५ दिवसांत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ३.८१ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते व दळणवळणाशी संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची डॉ.कोल्हे यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी नाशिक फाटा-राजगुरुनगर उन्नत मार्गाच्या कामाला गती देण्याची विनंती करण्यात आली.
या प्रकल्पासाठी एकूण १० हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यापैकी पीएमआरडीए क्षेत्रातील ६.९१ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उर्वरित ३.८१ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी पुढील १५ दिवसांत निधी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यासंदर्भात नितीन गडकरी यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सद्यस्थितीची माहिती घेतली तसेच भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, मंचर व कळंब बायपास परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी अंडरपास आणि सर्व्हिस रोड उभारण्याची मागणीही करण्यात आली. तसेच MSIDC कडे हस्तांतरित करण्यात आलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर, हडपसर-यवत आणि पुणे-शिरूर मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बाब खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.
यानंतर गडकरी यांनी MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित यांना दूरध्वनीवरून रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
नाशिक फाटा-राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठी होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया आणि निविदा प्रत्यक्षात कितपत वेगाने मार्गी लागते, याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिक उत्सुकतेने पाहत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *