समाजशील न्यूज नेटवर्क,धनकवडी (पुणे) (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : एकीकडे वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे माणसांनाच पाणी मिळणे कठीण होत असताना, दुसरीकडे मुक्या पक्ष्यांची भूक आणि तहान ओळखून त्यांच्यासाठी पुढे सरसावणारे हातही समाजात आहेत. धनकवडी येथील पुण्याई नगर परिसरात वरिष्ठ जनसेविका तथा पोलीस मित्र संघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती वर्षाताई नाईक यांनी अशाच माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
पुण्याई नगर परिसरात मागील महिनाभरापासून भूक आणि तहानेने व्याकुळ होणाऱ्या कबुतरांसाठी वर्षाताई नाईक नियमितपणे अन्न व पाण्याची व्यवस्था करीत आहेत. उन्हाच्या झळा सोसणाऱ्या या मुक्या जीवांना अन्नाचा घास आणि पाण्याचा घोट मिळावा, या भावनेतून त्यांनी हा संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे.
पुण्याई नगर परिसरात मागील महिनाभरापासून भूक आणि तहानेने व्याकुळ होणाऱ्या कबुतरांसाठी वर्षाताई नाईक नियमितपणे अन्न व पाण्याची व्यवस्था करीत आहेत. उन्हाच्या झळा सोसणाऱ्या या मुक्या जीवांना अन्नाचा घास आणि पाण्याचा घोट मिळावा, या भावनेतून त्यांनी हा संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे.

“माणुसकी केवळ माणसांपुरती मर्यादित नसावी; मुक्या जीवांनाही जगण्याचा अधिकार आहे!” हा संदेश त्यांच्या कृतीतून समाजासमोर येत आहे.
यावेळी वर्षाताई नाईक यांनी नागरिकांनाही विशेष आवाहन केले की, शहरातील पशू-पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या गच्चीवर, खिडकीत किंवा परिसरात शक्य असेल त्या ठिकाणी पाण्याची भांडी ठेवावीत. भटक्या प्राण्यांसाठी चारा, अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी. उन्हाळा व पाणीटंचाईच्या काळात या छोट्याशा कृतीमुळे अनेक मुक्या जीवांचे प्राण वाचू शकतात.इतकेच नव्हे, तर रस्त्याने जाताना अडचणीत असलेले, भुकेलेले किंवा गरजू लोक दिसल्यास त्यांची आस्थेने विचारपूस करावी. शक्य असल्यास पैसे देण्याऐवजी त्यांना अन्न आणि पाणी देऊन मदतीचा हात पुढे करावा, असेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्याच्या वेदना ओळखणारे मन आणि मदतीसाठी पुढे येणारे हात, हीच खरी समाजसेवा! वर्षाताई नाईक यांच्या या उपक्रमातून माणुसकीचा हाच जिवंत संदेश समाजाला मिळत असून, प्रत्येकाने आपल्या परीने मुक्या जीवांसाठी आणि गरजू माणसांसाठी संवेदनशीलतेने पुढे यावे, हीच या उपक्रमामागील भावना आहे.

