समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सतीश नाथराव मुंढे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल दीड महिन्यापासून फरार असलेल्या मुंढेला सोमवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास एसीबीच्या पुणे पथकाने शिरूर नगरपरिषद परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे शिरूर पोलीस ठाण्याशी संबंधित गाजलेल्या लाचखोरी प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटक न करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात मुंढे याने एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी टाकळी हाजी पोलीस चौकीत पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी सुरुवातीला एक लाख रुपये आणि तडजोडीनंतर ९५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर एसीबी ने सापळा रचला. टाकळी हाजी पोलीस चौकीत मुंढे याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. मात्र, एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच त्याने स्वीकारलेली लाच रक्कम आणि तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन तेथून पलायन केले. या प्रकारामुळे एसीबीच्या कारवाईत ही खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंडे फरार झाल्यापासून त्याचा शोध सुरू होता.अखेर एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी त्याला शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक केली. त्यानंतर विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.लाचेची रक्कम कुठे गेली ? गुन्ह्याची कागदपत्रे कोणाकडे होती ? या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? मुंढेच्या अटकेनंतर या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६
Home पुणे एसीबीच्या जाळ्यातून पसार झालेला शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार अखेर जेरबंद! ९५ हजारांची लाच स्वीकारून झाला होता फरार; दीड महिन्यानंतर शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक, २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

एसीबीच्या जाळ्यातून पसार झालेला शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार अखेर जेरबंद! ९५ हजारांची लाच स्वीकारून झाला होता फरार; दीड महिन्यानंतर शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक, २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
BySamajsheel NewsNovember 17, 20260
