समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : महाराष्ट्र शासनाने १० जून २०२६ रोजी कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण, सामाजिक सक्षमीकरण आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची शिरूर तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिरूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या पुढाकाराने कुंभार समाजातील पात्र बांधवांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.हक्काचे अधिकृत ओळखपत्र हातात मिळाल्याने कुंभार समाज बांधवांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
योजनांचा लाभ तळागाळातील कारागिरांपर्यंत पोहोचविणार
यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले की, “१० जून २०२६ चा शासन निर्णय हा पारंपरिक मातीकाम करणाऱ्या कुंभार समाजाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र कारागिरापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. अधिकृत ओळखपत्रामुळे योजनांचा लाभ घेणे, प्रशासकीय कामकाज तसेच व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये समाजबांधवांना निश्चितच सुलभता येईल.”
लिपिक भानुदास येडे यांचे मोलाचे योगदान
शासन निर्णयाची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी न करता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा, यासाठी तहसीलदार म्हस्के यांनी विशेष पुढाकार घेतला. पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, यादी तयार करणे आणि ओळखपत्रांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी तहसील कार्यालयातील लिपिक भानुदास येडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश
कुंभार समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भगवान अंजना रामचंद्र श्रीमंदीलकर, संपादक जागृत्त शोध, प्रदेशाध्यक्ष दक्ष मराठी पत्रकार संघ तथा अध्यक्ष राजर्षी शाहू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नांनाही या उपक्रमामुळे यश आले.
श्रीमंदीलकर यांनी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि लिपिक भानुदास येडे यांचे आभार मानताना सांगितले की, “शासनाच्या १० जूनच्या निर्णयाची कमी कालावधीत प्रभावी अंमलबजावणी करून कुंभार समाजाला सन्मानाची ओळख मिळवून दिल्याबद्दल संपूर्ण समाजाच्या वतीने प्रशासनाचे आभार. स्वातंत्र्यदिनी मिळालेले हे ओळखपत्र आमच्यासाठी केवळ कागदाचा तुकडा नसून हक्क, स्वाभिमान आणि नव्या ओळखीचे प्रतीक आहे.”
या कार्यक्रमास तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमोल भोसले, राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर, नगरसेविका सविता राजापूरे, नगरसेविका स्वप्नाली जामदार, मच्छिंद्र जामदार, शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच रामदास जामदार, शशिकांत शिर्के, विजय शिर्के, दत्तात्रय काळे यांच्यासह कुंभार समाजातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.प्रशासनाच्या या सकारात्मक आणि तत्पर भूमिकेमुळे शिरूर तालुक्यातील कुंभार समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शासन निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ समाजातील अधिकाधिक पात्र बांधवांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Home बातम्या पुणे स्वातंत्र्यदिनी कुंभार बांधवांना हक्काची ओळख; तहसीलदार बाळासाहेब म्हस्केंच्या पुढाकाराने शासन निर्णयाची गतिमान अंमलबजावणी

स्वातंत्र्यदिनी कुंभार बांधवांना हक्काची ओळख; तहसीलदार बाळासाहेब म्हस्केंच्या पुढाकाराने शासन निर्णयाची गतिमान अंमलबजावणी
BySamajsheel NewsAugust 18, 20260
Previous Postप्रशासन सुस्त की नागरिकांचा बेफिकीरपणा? वर्षाताई नाईक यांचा संतप्त सवाल धनकवडीतील स्वच्छतेचा बोजवारा; केके मार्केट परिसरासह पुण्याई नगर लेन क्रमांक ४ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य
Next Postशिरूर तालुक्यात ५,४८५ शिधापत्रिकांवरील धान्य बंद - सहायक पुरवठा अधिकारी दीपक केदार यांची माहिती
