कवठे येमाई दि. २७ (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलेवाडी परिसरात मोठ्या बिबट्याची दहशत निर्माण झाली असून भरदिवसा शेळीवर हल्ला केल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे शेतात १० ते १५ मजूर बाजरी काढण्याचे काम करीत असतानाच ही घटना घडल्याने काही काळ एकच धावपळ उडाली.
रोहिलेवाडी परिसरात सध्या बाजरी काढण्याचे काम सुरू आहे. दोन शेतांच्या मधील मोकळ्या जागेत बांधलेल्या मोठ्या शेळीवर अचानक बिबट्याने झडप मारली. शेळीला जबड्यात पकडून बिबट्या तिला जवळच्या उसाच्या शेतात घेऊन गेला. हा प्रकार पाहताच महिला,शेतमजुरांनी आरडाओरड करत उसाच्या शेताकडे धाव घेतली. मजुरांची चाहूल लागताच बिबट्याने शेळी सोडून तेथून धूम ठोकली.
दरम्यान, मजुरांनी जखमी शेळीला बिबट्याच्या तावडीतून बाहेर काढले. बिबट्याच्या हल्ल्यात शेळीच्या जबड्याला गंभीर जखमा झाल्या असून शेतकरी महिला व मजुरांनी तातडीने डॉक्टरांना बोलावून शेळी वर औषधोपचार केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने ती वाचेल की नाही, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
“बिबट्या आकाराने मोठा असून दिवसाढवळ्या त्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे,” अशी चिंता ज्येष्ठ शेतकरी छबनराव रोहिले यांनी व्यक्त केली.
दिवसा बिबट्याचा वावर; वन विभाग आता तरी जागा होणार का?
रोहिलेवाडी परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत आहे. शेतकरी, महिला व शेतमजुरांना शेतात जाण्याची भीती वाटू लागली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी शिरूर वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी छबनराव रोहिले,खंडू पवार,नवनाथ येडे,नाणेकर व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६
Home बातम्या पुणे भरदिवसा बिबट्याचा शेळीवर हल्ला! रोहिलेवाडीत दहशत; पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

भरदिवसा बिबट्याचा शेळीवर हल्ला! रोहिलेवाडीत दहशत; पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी
BySamajsheel NewsSeptember 27, 20260
