NEWS
Search

शिरूरमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदाच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण ! लोखंडी रॉड व कोयत्याचा वापर; तिघांविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

421

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,संपादक)  – ग्रामपंचायतीतील सदस्यपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. शिरूर ग्रामीण येथील पाषाण मळा परिसरात एकाच कुटुंबातील तिघांना लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता घडली.
याप्रकरणी सचिन भाऊसाहेब घावटे, प्रथमेश धनंजय घावटे व ऋषिकेश शेलार या तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा व सदस्यपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे सदस्यपद देण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच वादातून आरोपींनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून त्यांच्या पतीला घराबाहेर ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांचे दीर नितीन घावटे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. यावेळी प्रथमेश घावटे याने कोयत्याने फिर्यादीच्या मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवनाथ घावटे यांनी त्याचा हात धरून हल्ला रोखला.
त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळी पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी सोडून दुचाकीवरून पलायन केले.
याप्रकरणी सौ. सीमा सोमनाथ घावटे (वय ४०, रा. पाषाण मळा, शिरूर) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *