NEWS
Search

पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला,शिरूर पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद; मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

103

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे  (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील बोऱ्हाडेमळा, न्हावरा फाटा परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास न्हावरा फाटा येथील लक्ष्मी मार्ट किराणा दुकाना शेजारी महामार्गालगत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दुकानमालक रितेश एकनाथ आवटे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्ती कोणतीही हालचाल करीत नसल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित इसमाला खासगी रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रात्री ९:४० वाजण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.मृत इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून त्याने पांढऱ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. त्याची दाढी व डोक्याचे केस वाढलेले आहेत. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास शिरूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन  प्रभारी अधिकारी विनोद पाटील, पोलीस निरीक्षक,शिरूर पोलीस स्टेशन यांनी केली आहे




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *