समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील मलठण येथे मध्यरात्री ७ ते ८ जणांच्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने घरात घुसून वृद्ध दाम्पत्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मलठणसह संपूर्ण बेट भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरात ७ ते ८ जणांच्या टोळीने प्रवेश केला. गाढ झोपेत असलेल्या एकनाथ दंडवते आणि त्यांच्या ८० वर्षीय पत्नी यमुनाबाई दंडवते यांच्यावर दरोडेखोरांनी अचानक हल्ला चढवला. दोघांनाही लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. टाकळी हाजी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग आणि सहायक फौजदार राजेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सशस्त्र हल्ला; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
टाकळी हाजी पोलीस चौकीच्या हद्दीत यापूर्वीही विद्युत रोहित्र, मोटारी, केबल, दुचाकी चोरी, घरफोडी तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. आता थेट घरात घुसून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून दरोडा टाकण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना तातडीने अटक करून परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या सशस्त्र दरोड्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.