उमेदवारी नाकारल्याने पक्षनिष्ठ गावडे कुटुंब व समर्थकांचा राष्ट्रवादीला रामराम : कवठे – टाकळी गटातील समर्थकांसह भाजपात प्रवेश 

336
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या बेट भागातील कवठे- टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात मागील कित्येक वर्ष एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी राहून पक्षाचे अस्तित्व या गटात टिकवून ठेवणारे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणूक तयारीला लागा असे सांगून ही ऐनवेळेस त्यांचे तिकीट कापले गेल्याने नाराज झालेल्या गावडे कुटुंब व त्यांच्या सर्वच समर्थकांनी आपले अस्तित्व दाखवत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. व या जिल्हा परिषद गट,कवठे-मलठण गण,टाकळी हाजी-जांबुत गणात प्रथमच कमळ फुलवायचेच हा निर्धार केला.तर कालच राजेंद्र गावडे यांनी जिल्हा परिषदेसाठी,कांचन सांडभोर,सुनीता कड यांनी मोठ्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले.
यामुळे शिरूर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.कवठे-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून राजेंद्र पोपटराव गावडे,पंचायत समितीसाठी कवठे येमाई-मलठण  गणातून कांचनताई राजेंद्र सांडभोर तर जांबुत गणातून सुनिताताई बाळकृष्ण कड यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवार राजेंद्र गावडे व समर्थकांनी मागील सहा महिन्यांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती.मेळावे, मोहटादेवी दर्शन, जंगी आखाडा पार्टीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करत त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच ऐनवेळी त्यांच्या कट्टर विरोधकांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आल्याचे पहावयास मिळाले.
शिरूरचे माजी आमदार असलेले पोपटराव गावडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने राजकारण केले.त्यानंतर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालीही त्यांनी प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले.मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शब्दावर विश्वास ठेवून वयाच्या ८५ व्या वर्षातही ते  पक्षवाढीसाठी सक्रिय व प्रामाणिक भूमिका बजावत आले.मात्र अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनच उमेदवारी कापल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला.उमेदवारी ऐनवेळी नाकारल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना अश्रू अन्वर झाल्याचे पाहावयास मिळाले. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे “आता थांबायचं नाही, तर अन्यायाचा बदला लढूनच घ्यायचा,” असा निर्धार सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. “ही उमेदवारी कापणे नसून एका निष्ठावंत कुटुंबाची राजकीय हत्या आहे,” अशी भावना संपूर्ण शिरूर तालुक्यात व्यक्त होत आहे. ​गावडे कुटुंब समर्थांसह भाजपात दाखल झाल्याने गावोगावी त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक ठिकाणी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. रॅलीत महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता.कवठे येमाई येथे जेसीबीच्या साहाय्याने उमेदवारांवर​ फुलांचा वर्षाव करण्यात आला. या शक्ती प्रदर्शनामुळे​ विरोधकांमध्ये धडकी भरल्याचे चित्र दिसून आले.माजी आमदार पोपटराव गावडे व ​माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीताबाई गावडे यांच्या भाषणानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या​ डोळ्यांत अश्रू तरळले. “साहेबांवर झालेल्या​ अन्यायाचा प्रत्येक अश्रूचे आगामी  निवडणुकीत उत्तर देऊन वसूल करू” असा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांनी​ राजेंद्र गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांना मोठ्या​ मताधिक्याने ​निवडून आणण्याचा संकल्प देखील यावेळी व्यक्त केला 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds