NEWS
Search

मलठण येथे भीषण अपघात; भरधाव एर्टिगाची दुचाकीला जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू; चालक कार सोडून फरार!

598

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत अष्टविनायक महामार्गावर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगातील एर्टिगा कार ने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कार घटनास्थळी सोडून चालक फरार झाला असून शिरूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या भीषण अपघातात अजय बाळू देवकर (वय २८, रा. कवठे येमाई, ता. शिरूर) आणि किरण अर्जुन चोरे (वय २४, रा. डोंगरगण, चोरे वस्ती, ता. शिरूर) या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीच्या काळात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलठण येथील स्नेहल हॉटेलसमोर अष्टविनायक महामार्गावर मलठण बाजूकडून कवठे येमाईच्या दिशेने मारुती सुझुकी कंपनीची एर्टिगा कार (क्र. MH 03 EF 6559) जात होती. यावेळी कारचालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी समोरून येणाऱ्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलला कारने जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता आणि पोलिसांना माहिती न देता कारचालकाने घटनास्थळीच कार सोडून पलायन केले. याप्रकरणी सुरेश मारुती चोरे (वय ४७, रा. डोंगरगण, चोरेवस्ती, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघातास कारणीभूत ठरलेल्या एर्टिगा कार चालकाचा शिरूर पोलीस कसून शोध घेत असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटिंग करीत आहेत.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *