शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मागील १५ दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानात असलेल्या पॉस मशीनवर शिधापत्रिका धारकांचा अंगठा अर्थात आधार व्हेरिफाय करण्यासाठी असणारा सर्व्हर च सतत डाऊन होत असल्याने शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना नाहक ताटकळत उभे रहावे लागत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील स्वस्त धान्य दुकानदार तथा तालुका रेशनिंग संघटनेचे अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांच्या दुकानास आज गुरुवार दि. १९ ला सकाळीच भेट दिली असता तेथे शिधा घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून याबाबत दुकानदार रत्नपारखी यांना विचारले असता मागील १५ दिवसांपासून सातत्याने सर्व्हडाऊन मुळे शिधा वितरीत करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. तरीही प्रयत्न करून सर्व्हर लाईन मिळताच थंब घेऊन अथवा मोबाईल ओटीपी घेऊन शिधा वाटप सुरु ठेवले असल्याचे रत्नपारखी यांनी सा.समाजशिल शी बोलताना सांगितले. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असलेल्या कवठे येमाई त एकट्या रत्नपारखी यांच्या दुकानात १२८९ शिधापत्रिका धारकांची संख्या आहे. सर्वर डाऊन मुळे नागरिकांना नाहक मनस्तापास सामोरे जावे लागत असून ताटकळत,थांबावे लागत आहे. सर्वरचा बिघाड तात्काळ दुरुस्त व्हावा अशी मागणी शिधापत्रिकाधारकांतून व्यक्त होत आहे.
– महेश सुधाळकर – जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे
मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्रच सध्या हा प्रॉब्लेम येत आहे. सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांचे एकाच वेळी शिधावाटपाचे काम सुरु असल्याने सर्व्हर जाम होत आहे. याबाबत वरिष्ठांना कल्पना देण्यात आली असून शिधापत्रिका धारकांना नाहक त्रास होऊ नये व तात्काळ शिधा मिळावा म्हणून सर्व्हर तातडीने पूर्ण क्षमतेने व्हावा याची कल्पना देण्यात आली असून यात आगामी दोनच दिवसांत नक्कीच सुधारणा होईल.
सदाशिव व्हनमाने – पुरवठा निरीक्षक, शिरूर
– सर्वर डाऊन मुळे शिरूर तालुक्यातील दुकानदारांना शिधा वाटताना येत असलेल्या अडचणी बाबत वरिष्ठ कार्यालयास कल्पना देण्यात आली असून तर लवकरच त्यात सुधारणा होईल असे सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
सोमनाथ वचकल – जिल्हाध्यक्ष,रेशनिंग दुकानदार संघटना,पुणे
– मागील १५ दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील रेशन दुकानात दुकानदारांना पॉस मशिन ला येणाऱ्या अडचणी, सर्व्हर प्रॉब्लेम अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधितांना वेळोवेळी कळविण्यात आले आहे. राज्य सरकारचे रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्याकडे सरकारचे दुर्लक्ष च होत असून दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी प्रति महिना ५० हजार करावी, मार्जिन मनी प्रति क्विंटल ३०० रुपये करावे,जीवनाश्यक वस्तूंची झालेली दरवाढ पाहता सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाचा शिधा उपक्रम दर महिन्याला व कायमस्वरूपी राबविण्यात यावा.राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार आहेत. रेशन दुकानदार हा थेट जनतेशी संबंधित असणारा शासनाचा दुय्यम घटक असून त्यांच्या असणाऱ्या मागील बऱ्याच काळापासून प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्या व अडचणी संदर्भात तातडीने मंत्रालय मुंबई येथे बैठक घेण्यात यावी.