कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे : दि.२४ (प्रतिनिधी) – श्री दत्त पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त पुढील महिन्यात कवठे येमाई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी सुरू आहे. या धार्मिक सप्ताहाच्या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सप्ताहादरम्यान गावातील गणेश नावाच्या अनेक मंडळींनी एकत्र येत एक दिवस पुलाव प्रसाद देण्याचा स्तुत्य संकल्प केला आहे. यामध्ये गणेश रत्नपारखी, गणेश जोशी,गणेश गोसावी, गणेश कदम,गणेश उचाळे,गणेश मुंजाळ,गणेश दळवी,गणेश काळे,गणेश उघडे यांच्यासह अन्य गणेश मंडळींचा सहभाग असणार आहे.धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन भाविकांना प्रसादसेवा देण्याचा हा उपक्रम भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा आहे. एकत्रितपणे धार्मिक कार्यात योगदान देण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व भाविकांकडून स्वागत होत आहे.अखंड हरिनाम, भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून श्री दत्त प्रभूंचा जयघोष परिसरात घुमणार असून, भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळणार आहे.गावातील ‘गणेश नावाच्या मंडळींची पुलाव प्रसाद सेवा’ हा सप्ताहातील एक विशेष आकर्षणाचा विषय ठरणार आहे.

