समाजशील न्यूज नेटवर्क शिरूर,पुणे (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल सातारा जिल्ह्यातील पाचगणी,महाबळेश्वर परिसरात गेलेली असताना इच्छा नसताना देखील इयत्ता पाचवीतील एका अकरा वर्षीय बालिकेस जबरदस्तीने हॉर्स रायडिंग करण्यासाठी भाग पाडलेल्या व मुलीच्या मनास लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या विद्यालयातील शिक्षक नितीन अशोक चव्हाण यांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ व ८ व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ नुसार शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने शिरूर पोलिसांत रीतसर तक्रार/फिर्याद दाखल केली असून गुन्हा पाचगणी जि.सातारा पोलिसांकडे कालच वर्ग करण्यात आल्याची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
दरम्यान सविंदणे येथील याच शिक्षकास टोळक्याने भर चौकात बेदम मारहाण केल्या प्रकरणी निषेध म्हणून सविंदणे गाव बंद ठेवण्यात आले होते.शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकास झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत सरांना न्याय मिळालाच पाहिजे,आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या होत्या. घटनेचे गांभीर्य पाहून शिरूर पोलिसांनी सविंदणे येथे मोठा बंदोबस्त ठेवला होता.सुमारे चार तास चाललेल्या आंदोलकांना सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान सविंदणे येथील चव्हाण या शिक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी १२ जणांविरोधात शिरूर पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करीत आहेत.

