NEWS
Search

शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेला नवी दिशा! सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला वरिष्ठ पोलीस नेतृत्वाची सकारात्मक दखल!

84

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पोलीस महासंचालक श्री. सदानंदजी दाते यांच्या निर्देशांनंतर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांचीही गंभीर दखल – रांजणगाव पोलिस उपविभागीय कार्यालयात मंगळवारी घेतली विशेष बैठक.”
शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती, वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सातत्याने आवाज उठवूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी यापूर्वी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र, परिस्थितीत उचित सुधारणा व्हावी आणि वरिष्ठ स्तरावरून ठोस हस्तक्षेप व्हावा, या उद्देशाने दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी वाळुंज यांनी ॲड. उदय सरोदे यांच्यासह मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंदजी दाते यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान शिरूर तालुक्यातील विविध गंभीर प्रश्न आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर भूमिका मांडण्यात आली. पोलीस महासंचालक श्री. दाते यांनी या विषयांची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना सहा आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनीही या विषयाची दखल घेत आज दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, रांजणगाव येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन शिरूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.या बैठकीस पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज, घोडनदी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. उदय सरोदे आणि पत्रकार अरुणकुमार मोटे, नितीन बरवकर व संभाजी गोर्डे उपस्थित होते.
बैठकीत शिरूर तालुक्यातील परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक माने यांची विशेष अधिकारी नियुक्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिल्याचे वाळुंज यांनी सांगितले.

– ऍड.उदय सरोदे

पोलीस महासंचालक श्री. सदानंदजी दाते यांच्या दखलीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत पुढाकार घेतला, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. वरिष्ठ पोलीस नेतृत्वाने दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि संवादाची तयारी शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने आशादायी आहे.

– सामाजिक कार्यकर्ते – निलेश वाळुंज

वरिष्ठ अधिकारी यांनी घेतलेली गांभीर्याने दखल ही अत्यंत स्वागतर्ह असून शिरूर तालुक्यातील तमाम नागरिकांसाठी  महत्त्वाची बाब आहे. आज झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची असून लवकरच बदल दिसेल अशी अपेक्षा आहे. जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवण्या मागे कोणताही वैयक्तिक हेतू नसून सामान्य नागरिकांना सुरक्षित, निर्भय आणि न्याय्य वातावरण मिळावे, हाच उद्देश आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे रूपांतर आता ठोस कार्यवाहीत व्हावे आणि शिरूर तालुक्यात कायद्याचे राज्य अधिक प्रभावीपणे प्रस्थापित व्हावे, हीच अपेक्षा




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *