कवठे येमाई दि.२४ (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक नद्या कोरड्या पडल्या असून विहिरींची पाणीपातळी घटली आहे. पिण्याचे पाणी, शेतीचे सिंचन आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी चिंतेत आहेत.
शिरूर तालुका औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी औद्योगिक विकासाच्या तुलनेत ग्रामीण भागातील पाणीप्रश्न कायम असल्याचे चित्र आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पेरणीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. विहिरी, बोअरवेल आणि तलावांमधील पाणीसाठा कमी झाल्याने शेती व्यवसाय आता अडचणीत आला आहे.
सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव, न्हावरा, पाबळ, केंदूर, तळेगाव ढमढेरे यांसह तालुक्यातील विविध भागांत पाणी नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आर्थिक मदतीची प्रक्रिया सुरू असली, तरी काही पात्र शेतकरी बँक खात्यातील त्रुटी व तांत्रिक अडचणींमुळे मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मदतीचे वितरण विनाविलंब पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
पाणी नियोजनासाठी ठोस कृतीची गरज
तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने गावनिहाय आढावा घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्धता, तलावांमध्ये पाणी सोडणे, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि सिंचनाचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे.दरम्यान, निवडणुकीच्या काळात विकासाची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात पाणी, वीज, आरोग्य आणि शेतीचे प्रश्न कायम असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी आणि प्रशासनाने पक्षीय राजकारण बाजूला ठेवून दुष्काळी परिस्थितीवर एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.दुष्काळाच्या संकटातून शिरूर तालुक्याला बाहेर काढण्यासाठी केवळ आश्वासनांची नव्हे, तर पाणी व्यवस्थापनाच्या कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती ठोस पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६
Home पुणे शिरूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद ! नद्या कोरड्या, विहिरी आटल्या; पाणीटंचाईमुळे बळीराजा संकटात

शिरूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद ! नद्या कोरड्या, विहिरी आटल्या; पाणीटंचाईमुळे बळीराजा संकटात
BySamajsheel NewsNovember 24, 20260
Previous Postवैभव सूर्यवंशीचा मैदानावर ऐतिहासिक द्विशतकी तडाखा! ५३ चेंडूंत २०४ धावा; भारत अ संघाचा यूएईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय!
Next Postकवठे येमाई येथे श्री दत्त पौर्णिमेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; गणेश नावाच्या मंडळींकडून एक दिवस पुलाव प्रसाद सेवा
