कवठे विविध कार्यकारी सोसायटीत पिक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी : शेतकऱ्यांना पुन्हा तात्काळ पीक कर्ज देण्याचे संस्थेचे धोरण 

347

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील शेतकरी सभासद संख्या मोठी असणाऱ्या कवठे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी येथे सध्या पिक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चालू हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी कर्ज फेडीसाठी तसेच नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी सोसायटी कार्यालयात योग्य त्या कागदपत्रांसह दाखल होत आहेत.


सोसायटीचे सचिव शुभम सावंत यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले की, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांना संस्थेकडून तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जात असल्याची माहिती पुणे जिल्हा बँकेचे या भागाचे विकास अधिकारी संदीप पडवळ यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात त्रिया शिंदे, योगेश कांदळकर आणि मच्छिंद्र लंघे  हे कर्मचारी तत्परतेने काम करताना दिसून येत आहेत. सोसायटीच्या कार्यालयात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज सुरू असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.चालू व पुढील हंगामी शेतीच्या कामांना गती देण्यासाठी वेळेत कर्ज उपलब्ध होणे गरजेचे असून सोसायटीचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *