NEWS
Search

एल निनोचा प्रभाव ; पावसावर व शेतीवर परिणाम होण्याची शक्यता – सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांचा इशारा 

356
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – सध्याच्या हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे ‘एल निनो’ (El Niño) या नैसर्गिक हवामान घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याने निर्माण होणाऱ्या या घटनेचा परिणाम जगभरातील हवामानावर होत असून भारतातील मान्सूनवर,पावसावर व शेतीवरही मोठा परिणाम होणार असल्याची माहिती कृषी विभागातील कवठे-केंदूर बीट विभागाचे सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. कृषी क्षेत्राबरोबरच इतर ही बाबींवर त्याचा प्रभाव पडू शकतो असेही जाधव म्हणाले. आज बुधवार दि.१७ रोजी शिरूर तालुक्यातील केंदूर येथे झालेल्या बदलते हवामान,शेतकरी मार्गदर्शन,एल निनोचा प्रभाव,गाव शिवार फेरी कार्यक्रमासाठी,सरपंच सुदाम पऱ्हाड,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राम विठ्ठल साकोरे, प्रा.शरद अडूरकर,दशरथ सुक्रे,सूर्यकांत थिटे व अनेक शेतकरी बांधव आवर्जून उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना कृषी सहायक अधिकारी जाधव म्हणाले कि,तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एल निनो मुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यता असते. याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होऊ शकतो. काही भागांमध्ये पाण्याची तीव्र ते अतितीव्र टंचाईही जाणवू शकते.कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. ठिबक व तुषार सिंचनाचा वापर, कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड आणि हवामान अंदाजानुसार शेती व्यवस्थापन करण्याचा सल्ला देखील कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.”हवामान बदल जाणून घ्या, शेतीचे योग्य नियोजन करा” असा संदेश कृषी विभागाच्या वतीने नंदू जाधव यांनी दिला आहे.
सजग शेतकरी • सुरक्षित शेती • समृद्ध भविष्य
एल निनो काळातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी २५ कृतीसूत्रे,पाऊस कमी असो वा अनियमित, योग्य नियोजनाने शेती टिकवूया,पावसाची खात्री होण्यापूर्वीच घाईने पेरणी करू नका.
संपूर्ण क्षेत्राची एकाच दिवशी पेरणी टाळा.राखीव बियाण्याचा साठा ठेवा.कमी कालावधीच्या वाणांना प्राधान्य द्या.दुष्काळ सहिष्णू पिकांची निवड करा.ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ यांसारख्या पिकांना प्राधान्य द्या.मोनो क्रॉप पेक्षा मिश्र पीक पद्धती अवलंबा.तूर + सोयाबीन, ज्वारी + तूर, कापूस + मूग यांसारखी आंतरपिके घ्या.पिकांची विविधता वाढवा.उन्हाळी खोल नांगरणी करा.कंटूर बंडिंग व चराईबंदी करा.कंपार्टमेंट बंडिंग द्वारे पाणी अडवा.गादीवाफा (BBF) पद्धतीचा अवलंब करा.पेरणीनंतर मल्चिंग (आच्छादन) करा.पीक अवशेष जाळू नका.शेततळे व जलसाठा निर्मितीवर भर द्या.उपलब्ध पाणी संरक्षित सिंचनासाठी राखून ठेवा.ठिबक व तुषार सिंचन वापरा.खुरपणी व कोळपणी वेळेवर करून ओलावा जपा.हवामान अंदाजाचा नियमित अभ्यास करा.रोग व किडीचे सतत निरीक्षण करा.पावसात खंड पडल्यास पर्यायी पिकांची तयारी ठेवा.शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करा.शेतीसोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय किंवा शेळीपालन जोडा.
“पाणी वाचवा – माती जपा – पीक विविधता वाढवा” हे सूत्र अंगीकारा.लक्षात ठेवा “एकच पीक, एकच पेरणी आणि पावसावर पूर्ण अवलंबित्व” हे टाळा.
यशाचे सूत्र
मिश्र पीक पद्धती,कमी कालावधीची वाण,पाणी साठवण,हवामानानुसार नियोजन,आजचे नियोजन उद्याचे उत्पादन व उत्पन्न सुरक्षित करेल असा विश्वास कृषी सहायक अधिकारी नंदू जाधव यांनी व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *