समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – गेल्या दोन दिवसांपासून शिरूरच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून, दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
पोकळदरा येथील शेतकरी जिजाबा गंगाराम पोकळे यांच्या राहत्या घराची पश्चिमेकडील भिंत बुधवारी सकाळी अचानक कोसळली. सततच्या पावसामुळे भिंतीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने ही घटना घडल्याची माहिती त्यांचे पुत्र सतीश पोकळे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. भिंत कोसळल्यामुळे घर धोकादायक बनले असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोकळदरा येथील शेतकरी जिजाबा गंगाराम पोकळे यांच्या राहत्या घराची पश्चिमेकडील भिंत बुधवारी सकाळी अचानक कोसळली. सततच्या पावसामुळे भिंतीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने ही घटना घडल्याची माहिती त्यांचे पुत्र सतीश पोकळे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. भिंत कोसळल्यामुळे घर धोकादायक बनले असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, कवठे येमाई गावठाणालगत असलेल्या संदीप शंकर सांडभोर यांच्या घरालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्या घराशेजारी वाहणाऱ्या लेंडी ओढ्याला सध्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असल्याने पाणी घराच्या भिंतीत मुरले आणि त्यामुळे घराची बाजूची भिंत कोसळली. परिणामी हे घरही राहण्यास धोकादायक झाले असल्याचे संदीप सांडभोर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि, मे २०२५ मध्येच त्यांनी लेंडी ओढा खोलीकरण करणे तसेच जुन्या पाराजवळील ओढ्यातील अतिक्रमणे हटविण्याबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिला होता. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ओढ्यातील पाण्याचा दबाव वाढून अखेर घराची भिंत कोसळण्याची वेळ आली. याबाबत त्यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
सततच्या पावसामुळे शेतवस्तीवर जाणारे कच्चे रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच अनेक शेतांमधून आणि घरांसमोरून पावसाचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या घरांच्या भिंतींमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला असून जनावरांच्या गोठ्यां मध्येही चिखल व ओलसर वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, हा पाऊस कृषी क्षेत्रासाठी मात्र वरदान ठरत आहे. विशेषतः ऊस पिकाला या पावसाचा मोठा फायदा होणार असून शिवारातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही घरांच्या नुकसानीची माहिती मंडल अधिकारी विजय फलके यांना देण्यात आली असून संबंधित महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंचनाम्यानंतर शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

