समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात झेंडेवाडी परिसरात उभारलेली ६५ फूट उंच विठ्ठलाची भव्य दिव्य मूर्ती वारकरी आणि भाविकांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनली आहे. या मूर्तीच्या कपाळी सोन्याचा मुलामा दिलेला गंध असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील कठीण घाटमार्गावर वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन व्हावे, या उद्देशाने ही मूर्ती पुण्यातील उद्योजक विजयसा बाबुरावसा कोल्हापुरे यांनी २०१९ ला उभारण्याचे कार्य केले.तर पांडुरंगाची कृपा झाली तर या ठिकाणी लवकरच प्रति पंढरपूरची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे कोल्हापुरे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच या ६५ फूट उंचीच्या या भव्यदिव्य श्री विठ्ठलाच्या मूर्तीची मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. तर या विठ्ठलाची पूजा होता च वरुणराजाने ही जोरदार उपस्थिती लावल्याचे झेंडेवाडी चे सरपंच अमर झेंडे यांनी सांगितले. तर मागील ७ वर्षांपासून दिवे घाटातील श्री विठ्ठलाची वारी पूर्वी विधिवत पूजा झाल्यानंतर पावसाचे हमखास आगमन होत असल्याने वारकरी,भाविक भक्तांचे हे श्रद्धेय स्थान झाले असल्याचे ही झेंडे म्हणाले.

दिवे घाटातील ही ६५ फूट उंचीची श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती काळ्या पाषाणात साकारण्यात आली असून तिच्या मस्तकावरील गंध पंचधातूंचा आहे. त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.पुण्याचे उद्योजक,प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विजय कोल्हापुरे यांनी जून २०१९ मध्ये ही मूर्ती उभारली. प्रसिद्ध शिल्पकार सागर भावसार यांनी या अद्वितीय कलाकृतीला मूर्त स्वरूप दिले आहे.निसर्गरम्य दिवे घाट परिसरातील ही मूर्ती आज पुणे जिल्ह्याचे एक प्रमुख पर्यटनस्थळ आणि वारकरी संप्रदायाचे प्रेरणास्थान ठरली आहे.

