समाजशील न्यूज नेटवर्क,धनकवडी,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे धनकवडीच्या पुण्याईनगर मधील लेन नंबर एक, दोन तीन आणि चार मधील नागरिकांना जाणवणाऱ्या विविध समस्यांकडे कोणी लक्ष देईल काय ? असा संतप्त सवाल युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती वर्षा नाईक व परिसरातील नागरिकांकडून संतप्त सवाल व्यक्त केला आहे.
या परिसरातील नागरिकांना जाणवणाऱ्या विविध समस्यांबाबत नुकतेच पुण्याच्या कात्रज चौकातील येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त यांना विविध समस्यांबाबत दि. ०७ मार्चला परिसरातील नागरिकांच्या सह्यासह निवेदन देण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत ही कुठलीच कार्यवाही किंवा उपाययोजना करण्यासाठी कोणीच आले नसल्याचे श्रीमती नाईक यांनी समाजशील न्यूज शी बोलताना सांगितले.

लेन नंबर एक ते चार पुण्याई नगर दरम्यान मंडप साहित्य म्हणजे बांबू ,वासे ,लोखंडी स्टॅन्ड वगैरे लेन नंबर दोन तीन आणि चारच्या बोळांमध्ये पसारा मांडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उंदीर घुशी बांबू वरून चढून थेट खिडकीतून घरात प्रवेश करून घरामधल्या विविध वस्तूंचे नुकसान करून टाकले आहे. उंदीर,घुशींच्या उपद्रव मुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. मांडवाच्या पसाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता उखडून पुण्याई नगरच्या रस्त्यांची अनेक ठिकाणी अतिशय दुरावस्था झालेली आहे. पुण्यनगरीतील रहिवाशांनी मिळून खूप वेळा त्यांना मंडपाचे साहित्य पसारा काढण्याबाबत विनंती केली परंतु या बाबत व तो परिसर स्वच्छ राहावा म्हणून टाळले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. सदर बांबूमुळे जे पाईप फुटले होते ते त्या लोकांनी स्वतःच्या पदरचे चार हजार रुपये खर्च करून दुरुस्त करून घेतले आहेत. तसेच लेन नंबर चार मधील सपना सुपर मार्केटच्या लगत काही दिवसांपूर्वी खूप खणून ठेवलेले आहे त्यातून ड्रेनेजचे पाणी देखील येत असून तेथील रहिवाशांना दुर्गंधी च्या त्रासाला नाहक सामोरे जावे लागत आहे.परिसरातील नागरिकांना होत असलेल्या या त्रासाबद्दल व तेथील समस्यांबाबत कात्रज पुणे क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या परिसरात असलेल्या समस्या व नागरिकांना जाणवत असलेल्या अडचणी तात्काळ सोडविण्या कामी महापालिकेच्या कात्रज,पुणे क्षेत्रीय कार्यालयाने तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी युवा क्रांतीच्या श्रीमती वर्षा नाईक व धनकावडीच्या पुण्याई नगर परिसरातील नागरिकांतून होत आहे.