थकीत पाणीपट्टी,घरपट्टी तात्काळ भरा – अन्यथा नळ कनेक्शनवर हातोडा – कवठे येमाई ग्रामपंचायतीचा निर्णय 

38
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावर असलेली एक मोठी ग्रामपंचायत असलेल्या कवठे येमाई येथे आज ग्रामपंचायतीत करवसुली संदर्भात विचारणा व  नळाच्या पाण्याच्या अडचणी संदर्भात गावठाणातील महिला ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार घेऊन आलेल्या पाहावयास मिळाल्या. मागील काही दिवसांपासून गावठाण पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत सरपंच मनीषा पांडुरंग भोर व नवीन ग्रामपंचायत अधिकारी पूनम थोरात चितळकर यांना विचारण्यासाठी महिला भर दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात आल्या होत्या. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील वीज पुरवठा विस्कळीत असल्याने गावठाण पाणी पुरवठा करण्यात मोठी अडचण येत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.  या महत्वपूर्ण समस्येबाबत तात्काळ महावितरणचे टाकळी हाजी शाखा अभियंता नितीन मुरकुटे यांना याबाबत कल्पना दिली. मुरकुटे यांनी आजच तेथील वीजपुरवठा सायंकाळी ४ पर्यंत सुरळीत सुरु होईल अशे आश्वासन दिल्याने उद्यापासून गावठाणात योग्य त्या दाबाने नक्कीच पाणीपुरवठा होईल असा विश्वास ग्रामपंचायत कर्मचारी अजित शिंदे यांनी दिला. तर ग्रामपंचायतीस कर रुपी येणे असलेली थकीत पाणीपट्टी,घरपट्टी बाबत विचारणा केली असता निम्मा फेब्रुवारी महिना संपला तरी जेमतेम ४० टक्केच वसुली झाल्याची माहिती मिळाली. तसेच वसुली अभावी अनेक समस्यांना ग्रामपंचायतीस तोंड द्यावे लागत असल्याची ही माहिती मिळाली. यावर सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोर,माजी ग्रामपंचायत सदस्या नीता काळे,मंगल शिंदे व इतर महिलांनी थकीत नळपट्टी कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठोस व प्रभावी उपाय राबविण्याची गरज व्यक्त केली. यावर सरपंच मनीषा पांडुरंग भोर व नवीन ग्रामपंचायत अधिकारी पूनम थोरात चितळकर व उपस्थतांचे  एकमत होत थकीत पाणीपट्टी,घरपट्टी ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांनी दोन तीन दिवसांत तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयात येऊन भरावी अन्यथा नळ कनेक्शनवर हातोडा पडणार अर्थात थकीत पाणीपट्टी असलेल्यांचे नळ कनेक्शन तात्काळ तोडण्यात येण्याचा निर्णय कवठे येमाई ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच मनीषा पांडुरंग भोर व ग्रामपंचायत अधिकारी पूनम थोरात चितळकर यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
       प्राप्त माहिती नुसार गाव व गावठाणातील अनेक मान्यवर ग्रामस्थांकडे पाणीपट्टी,घरपट्टी अनेक वर्षांपासून थकीत आहे. आता नळ कनेक्शन तोडण्याची धडक कारवाई होणार असल्याने अशा थकबाकीदारांनी दिरंगाई,टाळाटाळ न करता आपापली ग्रामपंचायतीस देय असलेली पाणीपट्टी,घरपट्टी तात्काळ भरण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds