समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) — शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, मुंजाळवाडी, इचकेवाडी या गावातील ज्या शेतकरी बांधवांचे अद्याप महाविस्तार ॲपवर नोंदणी (रजिस्ट्रेशन) झालेले नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन या विभागाचे सहायक कृषि अधिकारी नंदू जाधव यांनी केले आहे. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी अत्यावश्यक असल्याने दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात तोटा सहन करावा लागू शकतो.

सध्या अनेक शेतकरी तांत्रिक कारणे, माहितीचा अभाव किंवा दुर्लक्षामुळे नोंदणीपासून दूर आहेत. मात्र वेळेत नोंदणी न केल्यास शासकीय अनुदान, योजना व इतर लाभ मिळण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. असे मंडल कृषि अधिकारी शिवाजी पाटील हे शेतकऱ्यांना माहिती देताना बोलत होते.
नोंदणी करताना कोणतीही अडचण येत असल्यास संबंधित कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा स्थानिक मार्गदर्शकांशी त्वरित संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनानेही या प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. “शेतकऱ्यांनी आजच पाऊल उचलावे, उद्या उशीर होऊ शकतो,” असा स्पष्ट इशारा सहाययक कृषि अधिकारी नंदू जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.

