समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – कुकडी प्रकल्प डावा कालवा वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था महासंघ, नारायणगाव या संस्थेच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी गठित करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी मागील २० वर्षांपासून सातत्याने आपल्या लेखणीतून आवाज उठविणारे वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांच्या उत्कृष्ट कार्याची दाखल घेत त्यांची महासंघाच्या तज्ञ संचालक पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रकाश वायसे यांनी दिली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व स्वागत समारंभ नुकताच निघोज ता.पारनेर येथे उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुकडी कालवा सदस्य प्रकाश वायसे हे होते.

यावेळी महासंघाच्या विविध पदांवरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी दिलीपराव मदने यांची तर कार्याध्यक्षपदी प्रकाश वायसे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी पांडुरंग ढवळे यांची तर कार्यकारी संचालकपदी रविंद्र शिंदे व रघुनाथ निचित यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळात चंद्रकांत लामखडे, अमोल कातोरे, संपतराव पानमंद, अमृताशेठ रसाळ, बाळासाहेब शिंदे,रामभाऊ शेळके, सुभाष शेटे,साहेबराव लोखंडे,प्रविण गायकवाड तर सचिवपदी अरुण सोमवंशी यांची निवड करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांसाठी पाणी वेळेवर कसे मिळेल, पाणी पट्टी वसुली व परतावे वेळेत करणे संस्थेचे आर्थिक लेखापरीक्षण तसेच चाऱ्यांची दुरुस्ती,भराव करणे, पाणी वापर संस्थांना पाणी मिळणे तसेच जलसिंचन योजना राबवत पाण्याची बचत करण्यासाठी मार्गदर्शन करणे या साठी काम करणे आवश्यक असल्याचे मत वायसे यांनी सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केले.कार्यक्रमास पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी, चेअरमन, संचालक मंडळ सदस्य तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

