समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील श्री मारुती मंदिरा समोर असलेले सुबाभळीचे उंच झाड आज दुपारी दोनच्या दरम्यान वारा नसताना अचानक कोसळले. जवळच उभ्या असलेल्या प्रा.शेटे पत्रकार यांच्या बोलेरो गाडीवरच हे झाड कोसळल्याने गाडीच्या छताचे मोठे नुकसान झाले. दरम्यान मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेले टाकळी हाजी -कवठे जिल्हा परिषद गटातील भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावडे हे त्याच ठिकाणी फोनवर बोलत होते.समवेत कवठे गणाच्या भाजपच्या उमेदवार कांचनताई सांडभोर यांचे पती राजेश सांडभोर व सहकारी ही त्याच परिसरात होते. दरम्यान पत्रकार सुभाष शेटे यांनी गावडे यांना आवाज दिल्याने ते ओट्यावर भेट घेत असतानाच अचानक कडकडाट होऊन ते झाड थेट चारचाकीवर कोसळले तर राजेंद्र सांडभोर व सहकारी श्री मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्याने सर्वच जण थोडक्यात बचावले. दैव बलवत्तर म्हणून आलेले विघ्न गाडीवर झाड कोसळल्याने दूर झाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

एकंदरीत कधी काय होईल याची पुसटशी कल्पना देखील कोणाला नसते.त्या ठिकाणी चारचाकी उभी नसती तर मोठ्या अपघाताची घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. दरम्यान झाड कोसळताना विजेच्या तारांवर ही फांद्या पडल्याने मोठे शॉर्टसर्किट झाले पण लगेचच ते थांबले.हे सुबाभळीचे पडलेले झाड तात्काळ तोडून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.



