NEWS
Search

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : ‘फार्मर कप’ स्पर्धेत लाखोंची बक्षिसे; शिरूर तालुक्यातून मोठ्या सहभागाचे कृषी आवाहन

71

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अभूतपूर्व संधी उपलब्ध झाली असून ‘फार्मर कप’ ही स्पर्धा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट बक्षीस देणारी जगातील एकमेव स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन शेतकरी गटांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असल्याची माहिती कवठे येमाई विभागाचे सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी तब्बल 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 30 लाख रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 20 लाख रुपये अशी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र गटांना प्रोत्साहन देण्यात आले असून राज्यातील पहिल्या तीन महिला गटांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
राज्यस्तरावर क्रमांक न मिळाल्यासही शेतकऱ्यांना जिल्हास्तरावर संधी आहे. जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी 5 लाख, द्वितीय साठी 3 लाख आणि तृतीयसाठी 2 लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातून अधिकाधिक शेतकरी गटांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


गटशेतीवर भर – यशाची गुरुकिल्ली
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान 11 कुटुंबांचा गट तयार करणे आवश्यक असून त्या गटाने एकत्रित किमान 15 एकर क्षेत्रावर एकच पीक घेण्याची तयारी असणे गरजेचे आहे. गट बांधणीसाठी ‘पाणी फाउंडेशन’च्या प्रशिक्षण घेतलेल्या निमंत्रकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.शेतकऱ्यांना स्पर्धेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 वाजता व सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन झूम मीटिंगचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक शेतकरी या मीटिंगमध्ये सहभागी होऊन आपले प्रश्न सोडवू शकतात.
शासन व संस्थांचा पुढाकार
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त पुढाकारातून ही स्पर्धा राबविण्यात येत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व गटशेतीला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.“यंदाचा फार्मर कप आपल्या शिरूर तालुक्यात आणायचा,” या उद्देशाने शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकजुटीने पुढे येत गट तयार करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ही तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *