समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : ((प्रा. सुभाष अण्णा शेटे, कार्यकारी संपादक) – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, कवठे हायस्कूलच्या इतिहासातील २४ मार्च २०१६ हा दिवस अत्यंत वेदनादायक ठरला होता. या दिवशी शाळेची जुनी इमारत व प्रयोगशाळा भीषण आगीत पूर्णतः भस्मसात झाली होती. मात्र या घटनेला आज दहा वर्षे पूर्ण होत असताना, त्याच जागी उभी राहिलेली अद्ययावत व सुसज्ज इमारत ही जिद्द, एकजूट आणि विकासाची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.
आगीच्या दुर्घटनेनंतर ग्रामस्थ, देणगीदार, माजी विद्यार्थी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शाळेच्या पुनर्बांधणीचा निर्धार केला. या सामूहिक प्रयत्नांतून आज अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन इमारत व सुसज्ज प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल झाली आहे. विज्ञान शिक्षणाला चालना देणारी ही प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण करत आहे.

या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी कवठे गावचे रहिवासी असलेले व संस्थेचे विद्यमान मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा. किसनराव रत्नपारखी यांचे विशेष मार्गदर्शन,सहकार्य लाभले. तसेच तत्कालीन मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे माजी आमदार राम कांडगे तसेच संस्थेतील अनेक आजी-माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी मोलाचे व भरीव योगदान दिले.
याशिवाय शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १ कोटी रुपयांचे आधुनिक सभागृह उभारण्यात येत असून, त्यासाठी शासकीय निधी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. तसेच सुमारे ४० लाख रुपये खर्चाचे सिमेंट कंपाऊंड बांधकाम ही संस्था व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रगतीपथावर आहे.
या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे एका दुःखद घटनेचे रूपांतर विकासाच्या मोठ्या संधीमध्ये झाले आहे. आजची सुसज्ज प्रयोगशाळा, नव्याने उभारलेली इमारत आणि प्रगत पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवे दालन खुले करत आहेत. कवठेकरांसाठी ही केवळ इमारत नसून, ती त्यांच्या एकजुटीचे, सामाजिक बांधिलकीचे आणि जिद्दीचे जिवंत प्रतीक ठरली आहे.

