समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावर असलेली एक मोठी ग्रामपंचायत असलेल्या कवठे येमाई येथे आज ग्रामपंचायतीची मासिक मिटींग संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा पांडुरंग भोर या होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ इचके यांनी ग्रामपंचायतीस कर रुपी येणे असलेली थकीत पाणीपट्टी,घरपट्टी बाबत पाढा वाचतानाच वसुली अभावी अनेक समस्यांना ग्रामपंचायतीस तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले. यावर माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,सुभाष उघडे,राजेंद्र इचके,निखिल घोडे पाटील व उपस्थित सदस्यांनी थकीत नळपट्टी कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठोस व प्रभावी उपाय राबविण्याची गरज व्यक्त केली. यावर उपस्थित सर्वांचे एकमत होत थकीत पाणीपट्टी,घरपट्टी ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांनी दोन तीन दिवसांत तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयात येऊन भरावी अन्यथा नळ कनेक्शनवर हातोडा पडणार अर्थात थकीत पाणीपट्टी असलेल्यांचे नळ कनेक्शन तात्काळ तोडण्यात येण्याचा निर्णय कवठे येमाई ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच मनीषा पांडुरंग भोर व ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
प्राप्त माहिती नुसार गाव व गावठाणातील अनेक मान्यवर ग्रामस्थांकडे पाणीपट्टी,घरपट्टी अनेक वर्षांपासून थकीत आहे. आता नळ कनेक्शन तोडण्याची धडक कारवाई होणार असल्याने अशा थकबाकीदारांनी दिरंगाई,टाळाटाळ न करता आपापली ग्रामपंचायतीस देय असलेली पाणीपट्टी,घरपट्टी तात्काळ भरण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.