समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री तथा शिरूर आंबेगाव चे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीतून कोट्यवधी रुपये खर्चून साकारलेल्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा चार पाच महिन्यांपूर्वी डळमळीत अवस्थेत असल्याचे पाहावयास मिळाले होते. रुग्णालयात नेमणुकीस असणारे अधिकारी,अनेक आरोग्य सेवक,कर्मचारी अनुपस्थित होते तर रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सेवा,व स्थानिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे तेव्हा मलठण ग्रामस्थ मोठेच आक्रमक झाले होते. ग्रामस्थांशी चर्चे नंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अतुल नागरे यांनी सर्वांगीण सुधारणा करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. याचा सकारात्मक परिणाम म्हणून येथील आरोग्य सेवेत लक्षणीय सुधारणा झाली असून दररोज किमान १०० ते १५० रुग्ण येथे शासनाच्या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेताना दिसून येत आहेत.


मलठण ग्रामस्थांचे सातत्याने या रुग्णालयातील रुग्णांना मिळणाऱ्या सेवा सुविधांकडे लक्ष असून रुग्णालयाचे कामकाज आता जनसेवेसाठी प्रामाणिकपणे सुरु असल्याचे पाहून समाधान व्यक्त करतानाच तेथील अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. येथीलच सेवा निवृत्त शिक्षक व शिरूर तालुका पेन्शनर असोशियन चे अध्यक्ष सुदाम भाऊ गायकवाड यांनी रुग्णालयास १२ उत्तमप्रतीच्या खुर्च्या व एक मोठा दूरचित्रवाणी संच भेट दिला आहे. तर ग्रामपंचायतीच्या वतीने एक सुसज्ज रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयास भेट देण्यात आली असून परिसरातील रुग्णांना एक्स रे काढण्यासाठी शिरूर सारख्या ठिकाणी जाऊ लागू नये व नाहक आर्थिक भुर्दंड पडू व याच रुग्णालयात ही सेवा मोफत उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने रुग्णालयातील सुसज्ज एक्सरे हॉल साठी तात्काळ दोन दिवसांत तीन एसी बसविण्यात येत असल्याचे सरपंच माधुरीताई विलासराव थोरात,माजी उपसरपंच दादासाहेब गावडे,रामभाऊ गायकवाड यांनी सांगितले.तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या याच रुग्णालयात रुग्णांना कशा उपलब्ध होतील याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे डॉ. अतुल नागरे यांनी सांगितले.
मलठण येथील ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर रोडवर गावापासून सुमारे २ किमी अंतरावर असून येथे परिसरातील विविध गावांतून येणाऱ्या रुग्णांना शासनाची मोफत व उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली.यावेळी सरपंच माधुरीताई थोरात, माजी उपसरपंच दादासाहेब गावडे,रामभाऊ गायकवाड,माजी शिक्षक सुदामभाऊ गायकवाड,नेवासकर रुग्णालयातील पुरुष व महिला कर्मचारी व अनेक मान्यवर ग्रामस्थ,रुग्ण उपस्थित होते.