समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – ग्रामदैवत श्री येमाई देवीचे ऐतिहासिक महत्व असलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक व लोकाभिमुख असा निर्णय घेत मृत्यूचा दाखला थेट दशक्रिया विधीत संबंधितांना देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील हा पहिलाच आदर्शवत उपक्रम ठरण्याची शक्यता असून या उपक्रमाची नुकतीच कवठे येमाई गावठाण येथील दशक्रिया विधी घाटात पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार,शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोर यांच्या हस्ते मृत व्यक्तीच्या नातलगांना मृत्यू प्रमाणपत्र देऊन करण्यात आल्याची माहिती नवनिर्वाचित सरपंच मनीषा भोर यांनी सा. समाजशील शी बोलताना दिली.
ग्रामीण भागामध्ये घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या मृत्यूची नोंद कुठे व का करायची व ती नोंद असणे कालांतराने खूप महत्वाचे ठरते. त्या करीता गावातील मृत झालेल्या व्यक्तीच्या घरातील कोणी ही सदस्याने ग्रामपंचायत कार्यालयास दोन दिवसांत तात्काळ कळविणे गरजेचे असून त्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या दशक्रिया विधी त मृत्यू प्रमाणपत्र त्यांना थेट मिळणार असून नागरिकांना या प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायतीत नाहक हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्याकरिता नागरिकांनी ही ग्रामपंचायतीस देय असलेला कर ग्रामपंचायतीस भरून सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच मनीषा भोर,ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ,ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.