बिबट्याचे सलग तीन दिवस पाळीव जनावरांवर हल्ले : कवठे येमाई परिसरात भीतीसह बिबट्यांची दहशत कायम 

291
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ; (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई शिवारात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये मोठीच वाढ झाली असून सलग तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांचा बळी घेतल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. यामुळे शेतवस्तीवर राहणारे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले असून बिबटयांची दहशत कायम असल्याचे पाहावयास मिळत आहे.
ऊस तोडणीमुळे बिबट्यांचा नैसर्गिक निवारा कमी झाला असून ते आता मानवी वस्त्यांच्या जवळ दिसू लागले आहेत. शनिवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास सतिष सुखदेव रोहिले यांच्या घरासमोरच्या गोठ्यात बांधलेल्या दोन वर्षांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. रविवारी (दि.१३) अक्षय घोडे यांची एक वर्षाची शेळी बिबट्याने ठार केली. सोमवारी (दि.१४) नानाभाऊ शंकर दाभाडे यांच्या दीड वर्षांच्या मेंढीवर शेताच्या कडेला चरत असताना झडप घालून तिला ठार करण्यात आले.या घटनांमुळे शेतकरी, मेंढपाळ व पशुपालकांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. जनावरांचे नुकसान तर झालेच आहे, पण आता मानवी जिवीतालाही धोका वाटू लागला आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुपालक त्रस्त झाले असून वनविभागाने तात्काळ व ठोस उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds