समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री तथा शिरूर आंबेगाव चे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीतून कोट्यवधी रुपये खर्चून साकारलेल्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा अद्याप ही रामभरोसे च असल्याचे पहावयास मिळाले. अधिकारी,अनेक आरोग्य सेवक,कर्मचारी अनुपस्थित होते तर रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सेवा,व स्थानिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे आज मलठण ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
येथे ३ वैद्यकीय अधिकारी त्यात एक अधीक्षक,एक पुरुष व एक स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नियुक्तीस असताना केवळ एकच डॉ.उपस्थित होते. तर २७ जण नेमणुकीस असताना केवळ १६ जण उपस्थित असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सकाळी दहाला आलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालया चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अतुल नागरे यांच्याशी संपर्क साधला. डॉ.नागरे हे दुपारी साडेबाराच्या सुमारास रुग्णालयात आले. ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची सरबत्ती केल्यावर कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता,कर्मचाऱ्यांना सक्त सूचना,रुग्णांची हेळसांड होणार नाही त्यांना बाहेरून औषधे आणावी लागणार नाहीत व रुग्णालयाची कुठलीही तक्रार येणार नाही याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

मलठण येथील ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर रोडवर गावापासून सुमारे २ किमी अंतरावर असून येथे परिसरातील विविध गावांतून येणाऱ्या रुग्णांना शासनाची मोफत व उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. येथे विविध तपासण्या करण्याच्या यंत्रणा असून काही कार्यान्वितच केल्या नसल्याने रुग्णांना नाहक भुर्दंड सोसत खाजगी व महागड्या आरोग्य सेवा घ्याव्या लागत असल्याचे ग्रामस्थ म्हणाले.यापुढे मलठण ग्रामीण रुग्णालयात प्रभावी कामकाज व रुग्णाभिमुख सेवा देण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्यास ग्रामस्थ याबाबत अधिक आक्रमक पद्धतीने शासनाकडे आवाज उठवतील असा इशारा उपस्थित मान्यवर ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनास दिला.
यावेळी समाजी उपसरपंच दादासाहेब गावडे,रामभाऊ गायकवाड,माजी चेअरमन नानासाहेब शिंदे,दत्ता गायकवाड,सुदाम गायकवाड, बंटी बोडरे,ग्रा.पंचायत सदस्य पोपट साळवे,पोपट गायकवाड व अनेक मान्यवर ग्रामस्थ,रुग्ण उपस्थित होते.