Search

पाणी वापर संस्थांच्या हस्तांतरणासाठी शेतकऱ्यांना आवाहन; २९ एप्रिलला कार्यशाळेचे आयोजन –  सुभाष अण्णा झिंजाड यांची माहिती 

6
समाजशील न्यूज नेटवर्क,नारायणगाव,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कुकडी प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी डिंभा उजव्या कालव्यावरील १३ तसेच पिंपळगाव जोगा कालव्यावरील पारनेर तालुक्यातील ६ पाणी वापर संस्थांचे हस्तांतरण लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यासोबतच ज्या ठिकाणी अद्याप पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या नाहीत, त्या ठिकाणीही संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक ती  कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती शिवनेरी वितरीका स्तरीय पाणी वापर संस्था महासंघ, कुकडी प्रकल्प नारायणगावचे अध्यक्ष सुभाष अण्णा झिंजाड यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील व लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता डिंभे धरण विभाग, मंचर (निघोटवाडी) वसाहत येथे पाणी वापर संस्थांविषयी कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करण्यात आले ​असल्याने शेतकरी बांधवानी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन झिंजाड यांनी केले आहे. 

या कार्यशाळेत पाणी वापर संस्थांचे महत्त्व,कार्यपद्धती, हक्काचे पाणी वितरण तसेच भविष्यातील पाणी व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा व आपले हक्काचे पाणी अबाधित ठेवण्यासाठी ​संघटीत पुढाकार घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.पाणी वापर संस्था नसल्यास भविष्यात पाणी मिळण्यात अडचणी येऊ शकतात तसेच पाण्याचे खाजगीकरण झाल्यास ते परवडणारे राहणार नाही, याची जाणीव ठेवून शेतकऱ्यांनी जागरूक होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.ही माहिती शिवनेरी वितरीका स्तरीय पाणी वापर संस्था महासंघ, कुकडी प्रकल्प नारायणगावचे अध्यक्ष सुभाष झिंजाड यांनी दिली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *