समाजशील न्यूज नेटवर्क,नारायणगाव,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भाग परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मीना शाखा कालव्यावरील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी नुकतीच कार्यकारी अभियंता नान्नोर साहेब यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती शिवनेरी वितरीका स्तरीय पाणी वापर संस्था महासंघ,कुकडी प्रकल्प नारायणगावचे अध्यक्ष सुभाष अण्णा झिंजाड यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. या बैठकीत कालव्याचे अस्तरीकरण, कालवा भराव, टेल डी.वाय. लाईनिंग, गेट दुरुस्ती, डी.वाय.-१ व डी.वाय.-२ ची वहन क्षमता वाढविणे, गळती रोखणे, पाणी कोठा, अतिक्रमण तसेच भुसपांदन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय झाला. याशिवाय कुकडी डावा कालवा वरील प्रलंबित कामे तसेच पिंपळगाव जोगा आणि उजव्या कालव्यावरील पाणी वापर संस्थांच्या हस्तांतरणाबाबतही चर्चा करण्यात आली.

मीना शाखा कालव्यावरील अनेक कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली असून, ती तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या कामांचे प्रस्ताव कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठविण्याची मागणी यावेळी आग्रहीपणे मांडण्यात आली.या चर्चेदरम्यान संत तुकाराम पाणी वापर संस्थेचे सचिव तथा मुक्ताबाई पाणी वापर संस्थेचे चेअरमन श्री. पांडुरंग डुकरे आणि जय बजरंग पाणी वापर संस्थेचे चेअरमन श्री. विश्वनाथ येवले उपस्थित होते. स्थानिक शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

