समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – राज्यात आधीच गारपीट, सातत्याने पडणारा अवकाळी पाऊस आणि बाजारभावाच्या अस्थिरतेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी २७ एप्रिल २०२६ पासून राज्यभर बेमुदत बंदचा इशारा दिल्याने शेती हंगामाच्या तोंडावर खते, बियाणे आणि किटकनाशकांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् अॅण्ड सीडस् डिलर्स असोसिएशन (माफदा) यांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात हा कठोर निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील आणि महासचिव विपीन कासलीवाल यांनी सांगितले की, मागील चार-पाच वर्षांपासून विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाकडे पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये खत पुरवठ्यातील ‘लिंकींग’ पद्धत रद्द करणे,अवैध HTBT कपाशी बियाण्यांवर बंदी, ‘साथी’ पोर्टलचा मर्यादित वापर, खत पुरवठा ‘FOR’ पद्धतीने करणे आणि विक्री मार्जिन वाढवणे यांचा समावेश आहे. तसेच बियाण्यांचे नमुने फेल झाल्यास विक्रेत्यांना आरोपी न ठरवता साक्षीदार मानावे, प्रलंबित रकमा तातडीने द्याव्यात आणि अवैध किटकनाशक विक्रीवर नियंत्रण ठेवावे, अशा विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढील आठ दिवसांत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २७ एप्रिलपासून राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवण्यात येतील.या संभाव्य बंदमुळे शेतकऱ्यांना वेळेवर खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध होणार नाहीत.आधीच गारपीट व कमी बाजारभावामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर हा आणखी एक मोठा आघात ठरू शकतो.दरम्यान, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावावा,अन्यथा शेतकरी आणि विक्रेते दोघांनाही मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

२७ एप्रिलपासून कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत बंद; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
BySamajsheel NewsApril 18, 20260
Previous Postमीना शाखा कालव्याच्या कामांना गती देण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांची भेट - सुभाष अण्णा झिंजाड
Next Postनारायणगावात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६”चा भव्य शुभारंभ : “पाणी हेच जीवन” पाणी वाचवा, भवितव्य घडवा चा दिला संदेश
