समाजशील न्यूज नेटवर्क,नारायणगाव,जुन्नर) : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कुकडी कार्यालय सभागृहात जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे यांच्या विद्यमाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६”चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जुन्नर विधानसभा सदस्य शरद सोनवणे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी घोड/कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार सदस्य प्रकाश वायसे, अशोक घोडके, सुभाष झिंजाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी मान्यवर व शेतकरी प्रतिनिधींचे स्वागत करत १५ ते ३० एप्रिल दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि,जलाशयांचे जतन,पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ठोस व योग्य त्या उपाययोजनांची गरज अधोरेखित केली. तसेच “गाळमुक्त धरण” उपक्रम राबवून धरणांची पाणी साठवण क्षमता क्षमता वाढवावी, धरणावरील रस्ते खड्डेमुक्त करावेत असे आवाहन करतानाच कुकडी प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
विशेष म्हणजे, यावर्षी या उपक्रमास महिला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला, जो कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला. गावोगावी पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आणि “पाणी हेच जीवन” पाणी वाचवा,भवितव्य घडवा हा संदेश देत सर्वांनी जलसंधारण,जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमास कुकडी पाटबंधारे विभागातील उपअभियंते, शाखा अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद डुकरे यांनी केले, तर शेवटी गणेश नान्नोर यांनी जलप्रतिज्ञा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

