समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुण्याच्या धनकवडी परिसरातील के.के. मार्केट समोर ओढ्यालगत, पानपट्टीसमोर आणि महादेव मंदिराच्या बाजूला पावसामुळे तब्बल आठ ते दहा फूट खोल खड्डा पडला असूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या खड्ड्यालागतच असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनला त्याच खड्ड्या नजीक गळती लागली पाणी सतत वाहत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.या खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी न करता नागरिकांची,वाहनांची सुरक्षितता लक्षात घेत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज जेष्ठ नागरिकांतून व्यक्त होत आहे.दरम्यान या खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
स्थानिक नागरिकांच्या मते, आणखी एक जोरदार पाऊस झाला तर हा खड्डा अधिक मोठा होण्याची शक्यता असून परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर पुण्याई नगर परिसरातही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रुबी बेकरीसमोर देखील सुमारे दहा फूट खोल खड्डा निर्माण झाला आहे. या संदर्भात अनेकदा बातम्या प्रसिद्ध होऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे संबंधित खड्ड्यांच्या नजीकच ओढा वाहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून जमिनीची धूप वाढत असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.“एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच महापालिका जागी होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेविका वर्षाताई नाईक यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या धोकादायक खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा मोठी दुर्घटना टाळता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

