नालासोपारा येथे स्वराज अभियानच्या माध्यमातून १२ ही महिने महिलांना विविध मोफत प्रशिक्षणे – परिसरातील १२०० प्रशिक्षित महिलांना मिळाले रोजगाराचे साधन – महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांचा पुढाकार – मोफत प्रशिक्षण घेतलेल्या युवती महिलांना प्रमाणपत्र वाटप
समाजशील न्यूज नेटवर्क : (नालासोपारा,मुंबई) – स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतिने व महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या पुढाकाराने नालासोपारा शहरात युवती व महिलांसाठी वर्षाचे बारा हि महिने मोफत ब्युटी पार्लर, शिवणकाम, मेहंदी, केक मेकींग, संगणक प्रशिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, बॅकीग कोर्सेस देण्यात येत असून यातून हजारो युवती – महिलांना प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. परिसरातील महिलाही प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या महिलांना नुकतेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
आजपर्यंत १२०० युवती – महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांनी केले आहे.शिवणकाम प्रशिक्षण घेऊन महिला ब्लाउज, ड्रेस, परकर, पिशवी, ऑर्डर घेऊन कामे घेत आहेत यामुळे त्यांच्या कुटूंबाला बऱ्यापैकी आर्थिक हातभार लागत आहे. तसेच मेहंदी व ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेतलेल्या महिला या आपल्या आजुबाजुला लग्न सोहळा, हळदी समारंभ, वाढदिवस विविध कार्यक्रमात जाऊन ऑर्डर घेऊन दोन पैसे कमवुन आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार लावण्याचे काम करीत आहेत.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे, अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षण, आरोग्य, कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे, महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांचे घर आणि कुटुंब सक्षम करणे हा एकमेव उद्देश असून महिलाना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी उपक्रम राबवण्या येत असल्याची माहिती नालासोपारा महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली. आजकालच्या धावत्या युगामध्ये अनेक महिला प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्या मध्ये एकोपा वाढण्यात मदत होत असल्याचे ही नाईक यांनी सांगितले.मोफत प्रशिक्षण घेतलेल्या युवती महिलांना रूचिता नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
रूचिता नाईक – महिला शहरप्रमुख,नालासोपारा,मुंबई
” महिलांसाठीची विविध व्यावसायिक प्रशिक्षणे पूर्णतः मोफत घेण्यात येत आहेत. प्रशिक्षणातून कौशल्य आत्मसात केल्यानंतर प्रशिक्षित महिला नोकरी करू शकेल अथवा स्वतःचा हिमतीवर व्यवसाय सुरू करून आणखी काही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकेल या उद्देशाने गेले आठ महिन्यांपासून युवती व महिलांना स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतिने मोफत प्रशिक्षण देण्यात येते तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.महिलांसाठीचा हा उपक्रम अतिशय दिशादर्शक व मार्गदर्शक ठरत असून अनेक महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यास मदत होत आहे.”