समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर पुन्हा अपघात झाल्याने हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनताना दिसून येतोय. काही दिवसांपूर्वीच कवठे येमाईच्या इचकेवाडी जवळ झालेल्या अपघात दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना,मुंजाळवाडी नजीक दरम्यान दुचाकी व चारचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना व परवा शिंदेवाडी मलठण दरम्यान झालेल्या ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत सुवर्णा रंगनाथ बारगळ, वय ४१ वर्षे, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर या ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहने नियंत्रित पणे चालवणे त्यातल्या त्यात दुचाकी चालवताना योग्य त्या सुरक्षा कवच सह चालकांनी खूपच सावधानता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या अपघाताबाबत रंगनाथ रावसाहेब बारगळ, वय ४२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार दि. १६ रोजी सकाळी साडेसहाच्या चे सुमारास मलठण, शिंदेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे गांवचे हद्दीत रांजणगांव ओझर अष्टविनायक हायवे रोडवरील हॉटेल जयमल्हारचे जवळ फिर्यादी व त्यांची पत्नी सुवर्णा असे दोघे त्यांच्या मोटार सायकल नं.एम एच 16/सी बी/9276 ही वरून मंचर बाजूकडे जात असताना समोरुन येणारे लाल रंगाचे ट्रॅक्टर नंबर माहीत नाही या वरील अनोळखी चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवून, रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून तो त्याचीअसलेली बाजू सोडून दुचाकीच्या बाजूला येवून त्यांचे मोटार सायकलला धडक देवून अपघात करुन अपघातामध्ये फिर्यादी यांची पत्नी. सुवर्णा रंगनाथ बारगळ, वय 41 वर्षे, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, हीस गंभीर व किरकोळ दुखापत करून तिचे मृत्युस तसेच मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभूत झाला असल्याने त्या अनोळखी लाल रंगाचे ट्रॅक्टर चालका विरुध्द फिर्याद बारगळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.
या महामार्गावर मलठण-कवठे- इचकेवाडी दरम्यान सातत्याने अपघात घडत असल्याने परिसरात खळबळ उडाली असून या गतिमान झालेल्या महामार्गावर धोकेदायक ठरणाऱ्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी युवा क्रांती पोलिस मित्र,ग्राहक पत्रकार,संरक्षण,माहि ती अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख,मार्गदर्शक वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे, स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांतून व्यक्त होत आहे.या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करीत आहेत.