समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील नाथनगर येथे रात्रीच्या वेळी गोठ्यातील शेळीवर हल्ला करून शेळीला घेऊन चाललेला बिबट्या जवळील विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या शेळीला घेऊन थेट विहिरीत पडला.ही घटना मंगळवारी (दि.१८) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. त्यानंतर शिरूर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले.
सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथनगर येथे पहाटेच्या सुमारास प्रभू सावळेराम नरवडे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केला. शेळीला घेऊन जात असताना त्याला जवळ असलेल्या विहिरीच्या रिंगचा अंदाज न आल्याने त्यावरून उडी मारताना तो थेट शेळीला घेऊन विहिरीत कोसळला. शेळ्यांच्या ओरडण्याचा व विहिरीतून बिबट्याचा आवाज ऐकू आल्याने शेजारील शेडमध्ये झोपलेल्या व्यक्तीला जाग आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले त्यांना बिबट्या शेळीला घेऊन विहिरीत पडल्याचे दिसून आले. या घटनेत शेळी ठार झाली. तदनंतर नरवडे यांनी घडलेला प्रकार नागरिकांना सांगितला.
नागरिकांनी घटनेची माहिती शिरुर वनविभागाचे या भागाचे अधिकारी नारायण राठोड यांना दिली. तदनंतर वनपरिमंडळ अधिकारी भानूदास शिंदे,क्षेत्र अधिकारी नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड हे रेस्क्यू टीमसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला पिंजराच्या सहाय्याने सुरक्षित विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले आहे.